मी पाहिलं एक स्वप्न.... दिव्यांग नव कवींचे संमेलन उत्साहात

कवींनी जिंकली उपस्थितांची मने

Jan 17, 2025 - 17:57
Jan 17, 2025 - 17:58
 0  2
मी पाहिलं एक स्वप्न.... दिव्यांग नव कवींचे संमेलन उत्साहात

पिंपरी : मी पाहिलं आज एक स्वप्न मुक्तेचे मानवतेचे... अशी मानवतेचं महत्त्व सांगणारी कविता, आयुष्य हा संघर्ष असतो, कधी तिखट तर कधी गोड असतो... अशी आयुष्याचं महत्त्व सांगणारी कविता,  वेदनेने भरले जरी मन तरी हे जीवन आहे, परी स्वप्न उराशी जिंकेन जग सारे... अशी आत्मविश्वास निर्माण करणारी कविता ऐकण्याची संधी पर्पल जल्लोष कार्यक्रमामध्ये रसिकांना मिळाली. निमित्त होते साहित्य जत्रेतील नव कवी संमेलनाचे.  

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्‍लोष’ हा दिव्यांग महोत्सव पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९  जानेवारी २०२५  याकाळात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. या संमेनात शुक्रवारी, 17 जानेवारी रोजी साहित्य जत्रा कार्यक्रम झाला. यातील नव कवी संमेलन उपक्रमांत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या नव कवींनी सादर केल्या कवितांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.  

‘नव कवी संमेलन’ मध्ये सचिन वाघमारे (पुणे), लतिका उमप (पुणे), सुशिला आवलोळ (पुणे), सुप्रिया यादव (पुणे), दीपिका क्षीरसागर (अमरावती), गणेश निकम (जळगाव), ऋचा पत्की (लातूर), राकेश खैरनार (जळगाव), नवनाथ भारभिंगे (पुणे) हे कवी सहभागी होऊन कवितांचे सादरीकरण केले. या कवितांमध्ये आईचं नातं, दिव्यांगांच्या समस्या आणि उपाय, आत्मविश्वास, आयुष्य, दिव्यांगांच्या भावना व व्यथा अशा विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित रसिकांनीही या कवितांना उत्तम प्रतिसाद दिला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय आव्हाड (मुंबई) यांनी केले.  

...... 

चौकट  

 नव कवीचे झाले कौतुक 

नव कवी संमेलन झाल्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कवींचे कौतुक करण्यासाठी रसिकांनी लगबग सुरू होती. अनेकांनी उपक्रमात सहभागी झालेल्या कवींचे संपर्क क्रमांक घेतले. तसेच त्यांना कविता लेखन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. 

....... 

चौकट 

 साहित्य जत्रेची झाली अनोखी सुरूवात 

पर्पल जल्लोष मधील साहित्य जत्रेची अनोख्या पद्धतीने सुरुवात करण्यात आलीआहे. यामध्ये व्हीलचेअरवर पुस्तके ठेवून ती साखळ दंडाने बांधण्यात येऊन त्याला कुलूप लावले गेले होतेआहे. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या  मान्यवरांनी हे कुलूप उघडून साहित्य जत्रेला सुरुवात केली. त्यानंतर साहित्य जत्रेतील पहिला उपक्रम नव कवी संमेलन उत्साहात झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow