भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच!

TDNTDN
Jan 17, 2025 - 08:06
Jan 17, 2025 - 08:06
 0  5
भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५' कार्यक्रमाचे मुंबई येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटीआय गोवंडी येथील हयूलेट-पॅकार्ड इंडिया द्वारे उभारण्यात आलेल्या 'डिजिटल मीडिया सेंटर ऑफ एक्सलन्स'चे दूरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया धोरणाची २०१६ मध्ये घोषणा केली तेव्हा देशात स्टार्टअप्सची संख्या ४७१ होती, आज ही संख्या १,५७,००० वर पोहचली आहे. यातील २७,००० पेक्षा अधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. यासोबतच महिला केंद्रीत धोरणांमुळे महाराष्ट्र हे स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला संचालाक असलेले राज्य झाले आहे.

केवळ एका वर्षात महाराष्ट्रात स्टार्टअप्समधील गुंतवणुकीत १५४% ची विक्रमी वाढ झाली आहे. या वेगाने, सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच तिसर्‍या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहचेल हा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्टअप क्रांती तळागाळात पोहचवण्यासाठी कर सवलती, पेटंट अर्ज प्रक्रियेला वेग, स्वयं-ओळखीची परवानगी, किफायतशीर इंटरनेट सेवांसारखे विविध पुढाकार अधोरेखित केले. यासोबतच सिडबी (SIDBI) कडून स्टार्ट अपसाठी प्रत्येक प्रादेशिक विभागाला ₹३० कोटींची तरतूद केल्याचे स्पष्ट केले.

यावेळी एआयसाठी 'फ्युचर रेडी इकोसिस्टम' बनवण्यासाठी सार्वजनिक तसेच खाजगी विद्यापीठांमार्फत 'एआय सेंटर ऑफ एक्सेलन्स' बनवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. यामार्फत स्टार्टअप्सना एआयच्या युगात प्रवेश करणे अधिक सोपे जाणार आहे  व एआय स्टार्टअपचे सक्षमीकरण करून उत्कृष्टतेचे केंद्र बनतील हा विश्वास व्यक्त केला. सरकारचा खाजगी आणि सार्वजनिक विद्यापीठांशी भागीदारी करून महाराष्ट्राला एआयचालित स्टार्टअप्ससाठी एक जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय आहे हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'स्टार्टअप्स केवळ आर्थिक मूल्यच निर्माण करणार नाहीत, तर भारतीय युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधीही प्रदान करतील' हा विश्वास व्यक्त केला. राज्याला स्टार्टअपमध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी उपस्थित उद्योजकांना केले. यासोबतच जुने स्टार्टअप धोरण बदलण्यासाठी नवीन प्रारूप तयार केले त्यावर सूचना देण्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आवाहन केले.

यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यात स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी खलील ३ महत्त्वपूर्ण घोषणा केल्या:
▪️सिडबी या वित्तीय संस्थेसोबत ₹२०० कोटींच्या फंड्स ऑफ फंड उभारणीसाठी करार
▪️महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार
▪️देशातील सर्वात आधुनिक स्टार्टअप्स पॉलिसी तयार करणार

यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow