पिंपरीत ४०० एकरमध्ये होणार निरंकारी संत समागम

२४ जानेवारीपासून निरंकारी संत समागमात मानवतेचा महासंगम पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी

Jan 18, 2025 - 07:54
Jan 18, 2025 - 08:08
 0  38
पिंपरीत ४०० एकरमध्ये होणार निरंकारी संत समागम

महाराष्ट्राचा ५८वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण सातत्याने आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे ४०० एकरच्या विस्तीर्ण मैदानात शुक्रवार, दि.२४ जानेवारी २०२५ पासून हा तीन दिवसीय संत समागम सुरू होत असून, त्याची सांगता २६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी २ वाजता सुरू होईल ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी सद्गुरु आणि ईश्वराप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करतील. शेवटी रात्री ८ वाजल्यापासून सर्वांना सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा पवित्र आशीर्वाद लाभणार आहे.
            मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यांतून निरंकारी भक्तगणांनी समागम स्थळांवर येऊन आपल्या निष्काम सेवांच्या माध्यमातून समागम स्थळाला एका सुंदर नगरीच्या रुपात परिवर्तित केले आहे. सर्व श्रद्धाळू ज्या उत्साहाने, आवडीने, भक्तिभावाने, मर्यादा व अनुशासनाचे पालन करत आपल्या सेवा निभावत आहेत ते पाहून जनसामान्य अत्यंत प्रभावित आहेत. समागम स्थळाचे हे अनुपम दृश्य आजूबाजूने जाणाऱ्या वाटसरूंना आणि स्थानिक नागरिकांना आकर्षण व उत्सुकतेचे केंद्र बनून राहिले आहे.  
            मानवतेच्या कल्याणासाठी आयोजित केलेल्या या संत समागमाचे साक्षी बनण्यासाठी समस्त भाविकांना व निरंकारी भक्तगणांना नुक्कड नाटक, बॅनर तसेच पुण्याच्या कानाकोपऱ्यात खुल्या प्रांगणांमध्ये सत्संगच्या माध्यमातून सादर आमंत्रित केले जात आहे ज्यायोगे त्यांनी या संत समागमामध्ये सहभागी होऊन आपले जीवन सार्थक करावे.
            समागमात सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांसाठी व्यापक स्तरावर निवासी तंबू, लंगर, कॅन्टीन, दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि रेल्वे स्थानक आणि बसस्थानकातून ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था इत्यादीची यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम स्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून समागम स्थळावर वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनीचेही आयोजन केले जात आहे यासह एकूण आठ कार्यशाळा असलेली भव्य बाल प्रदर्शनी देखील असेल, प्रत्येक कार्यशाळा मुलांना आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.
            भक्तिभावाने केल्या गेलेल्या या सर्व पूर्वतयारीमध्ये कुशलतेची एक सुंदर झलक पहायला मिळत आहे. निश्चितच या संत समागम मध्ये देश-विदेशातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीची व सार्वभौमत्वाची छटा उमटलेली पहायला मिळेल आणि यामध्ये सहभागी होणारे समस्त भाविक भक्तगण अलौकिक आनंदाची प्राप्ती करत सद्गुरु व संतांच्या दिव्य वाणीने प्रभावित होऊन आपल्या जीवनाच्या मूळ उद्देशाकडे अग्रेसर होत प्रेमाभक्तीच्या भावनेचा विस्तार करतील. मानवतेच्या या महामेळाव्यासाठी प्रत्येक धर्मप्रेमी बंधू भगिनींना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow