शाळांसाठी सुरक्षित रस्ते, पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी निगडीतील शाळेभोवती रस्त्यांची पुनर्रचना
पिंपरी २१ जानेवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित रहावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांचा संयुक्त उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने निगडी परिसरातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेच्या आजुबाजुचे सार्वजनिक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी सात दिवसांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. २० जानेवारी २०२५ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने महापालिका रस्त्यांच्या रचनेत सुधारणा केली जात आहे. शाळेमध्ये पायी तसेच सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या अंतर्गत शाळा परिसरातील वाहतुकीची गती नियंत्रित करून अपघात कमी होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित सुधारणांमध्ये पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडणे शक्य व्हावे, वाहन वेग मर्यादा, विस्तारित फूटपाथ, आणि सायकल मार्ग यांचा समावेश आहे.
या प्रकल्पाच्या सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महृपालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह या पुनर्रचनेचा प्रभाव समजून घेण्यासाठी मूल्यमापन करतील. यामध्ये रस्त्यांच्या स्थितीचा माहिती संकलित केली जाईल. त्यानुसार सुधारणा आणि वाहनांच्या वेगाबाबत अंदाज लावणे शक्य होईल.
……..
चौकट
शाळांभोवतीचा परिसर होणार अधिक सुरक्षित
ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने परिसरातील रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये ३० टक्के विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय केले जात आहेत. पाच हजार चौ.मी. क्षेत्र पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व वाहनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहतुकीचा वेग २० किमी/प्रतीतास नियंत्रित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या प्रयत्नामुळे शाळांभोवतीचा परिसर अधिक सुरक्षित होईल, आणि हा प्रकल्प शहरातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल.
.............
चौकट
विद्यार्थ्यांचा घेतला अभिप्राय
शाळेच्या आजुबाजुच्या सार्वजनिक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांनी विद्यार्थी, परिसरातील नागरिक, शिक्षक यांच्याशी संवाद साधत त्यांना शाळेत ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, रस्त्याबाबत त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा समजून घेतल्या. यामध्ये रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी, पार्किंग, अतिक्रमणे, पायाभूत सुविधा आणि शाळेच्या परिसरातील वाहतूक अंमलबजावणी अशा विविध मुद्यांवर संवाद साधण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतुकीशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आले. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांचा अभिप्राय लक्षात घेऊन सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला.
......
कोट:
विद्यार्थ्यांच्या प्रवासाला सुरक्षितता आणि सोयिस्करता प्रदान करणे, हे महापालिकेचे प्राधान्य आहे. हा प्रकल्प इतर शाळांमध्येही मार्गदर्शक ठरेल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सहाय्यभूत ठरेल. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंदायक बनवण्यावर लक्ष केंद्रित करणारा आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
..........
कोट :
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होईल. विद्यार्थ्यांचा प्रवास कशा पद्धतीने सुरक्षित करता येऊ शकतो, याचा अभ्यास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे.
- जशवंत तेज कासला, प्रकल्प अधिकारी, ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह
.............
What's Your Reaction?