लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी स्मार्ट सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मेळावा यशस्वीपणे संपन्न
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन (LCF), आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १२०० हून अधिक युवकांनी नोंदणी केली. अनेक युवकांनी या संधीचा लाभ घेत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्याचा मार्ग स्वीकारला आहे.
या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. अण्णा बोदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटी कंपनी सेक्रेटरी चित्रा पणवार, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी श्रीमती अमृता बहुलेकर, कौशल्य प्रकल्प प्रमुख श्री. समीर शेख, आणि ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) चे श्री. सुब्रत नायक हे मान्यवर उपस्थित होते.
कौशल्यम प्रकल्प प्रमुख श्री. समीर शेख यांनी युवकांना कौशल्यम प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन प्रकल्पाचे महत्व स्पष्ट केले. श्रीमती अमृता बहुलेकर यांनी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनद्वारे युवकांना मिळणाऱ्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केले. श्री. अण्णा बोदाडे यांनी महानगरपालिकेच्या औद्योगिक क्षेत्रातील महत्व अधोरेखित करत, रोजगार मेळाव्याचा लाभ घेत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. तसेच, श्री. सुब्रत नायक यांनी युवकांनी भाषेची भीती कमी करून आत्मविश्वास कसा वाढवावा, यासंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले.
'कौशल्यम' उपक्रमाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य
प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या १५ ते ३५ वयोगटातील युवकांना शिक्षण, मोफत प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्यम उपक्रम कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड क्षेत्रातील ११ ठिकाणी लाईट हाऊस कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
हे केंद्र पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, बोपखेल, बोऱ्हाडेवाडी, दापोडी, नेहरूनगर, आकुर्डी, किवळे, आणि चिखली या भागांत कार्यरत आहेत. लवकरच अजून ४ ठिकाणी अशा स्वरूपाची केंद्रे सुरू होणार आहेत. कौशल्यम उपक्रमा अंतर्गत, २०२४-२५ या वर्षात पिंपरी चिंचवड क्षेत्रातील १२०४ युवकांना नोकरी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली आहे. हे युवक आता त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करियर करत असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहेत.युवकांच्या यशस्वी भविष्यासाठी 'कौशल्यम' उपक्रम नव्या संधी उभारण्यात सातत्याने कार्यरत आहे.
लाईटहाऊस केंद्राची माहिती
लाईटहाऊस मध्ये नाव नोंदणी केल्यावर, प्रत्येक विद्यार्थ्याला फाउंडेशन कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स सर्वांसाठी मोफत असून, याचा कालावधी २२ दिवसांचा आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल ट्रेनिंग दिले जाते, त्यांना इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण मिळते. मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होते. फाउंडेशन कोर्स पूर्ण केलेल्या युवा वर्गाची आवड, क्षमता आणि गुणवत्ता, व्यक्तिमतत्व याविषयी अधिक माहिती देणारी करिअर टेस्ट घेतली जाते. या चाचणीचा निकाल, युवकांचे मत, आणि भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे आणि पालकांचे समुपदेशन केले जाते व विद्यार्थ्यांना स्वतःसाठी योग्य वाटेल असा स्किलिंग कोर्स निवडण्यासाठी प्रोत्साहीत करतात. लाईटहाऊस केंद्राद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास कोर्सेस चालू आहेत. काही कोर्सेस पूर्णपणे मोफत असतात तर काही कोर्सेसला नाममात्र फी असते. Tally, कॉम्पुटर ऑपरेटर, CNC, हेल्थ, जिम इंस्ट्रकटर, नर्सिंग सहायक, ग्राफिक डिझाइन, सॉफ्टवेअर लँग्वेजेस हे व इतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. नोकरीला लागण्यापूर्वीचे ट्रेनिंग, रिझ्युमे तयार करणे, मुलाखतीची तयारी करून घेणे आणि मुलाखतीच्या संपूर्ण प्रक्रियामध्ये प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक सहाय्य करणे हे या टप्प्यावरील महत्वाचे मुद्दे आहेत.
What's Your Reaction?