अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सत्र..
पिंपरी, १४ जानेवारी २०२५:- भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवण्यापुर्वी घ्यावयाची दक्षता व भूकंप आल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतचे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जवानांना आज झालेल्या प्रशिक्षण सत्रात देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत नैसर्गिक आपत्ती उद्भवू नये तसेच उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सत्राचे आयोजन १३ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत चिंचवड येथील विज्ञान केंद्र येथे करण्यात आले आहे. जपानमधील आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी कार्य करत असलेल्या स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर येथील प्रतिनिधी कार्यालयाच्या सहकार्याने हे प्रशिक्षण घेण्यात येत असून नैसर्गिक आपत्ती हाताळण्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन अग्निशमन अधिकारी आणि जवानांना या माध्यमातून करण्यात येत आहे.
या प्रशिक्षण सत्राच्या दुसऱ्या दिवशी भूकंपाशी निगडीत आपत्तीचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण महापालिकेच्या अग्निशमन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी व जवानांना देण्यात आले. या प्रशिक्षण सत्रास उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त किशोर ननवरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे तसेच अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात जपानच्या सिंगापूर येथील “जे.क्लेर” संस्थेचे विशेषज्ञ शिआमि यांनी भूकंप येण्यापूर्वी नागरिकांनी करावयाच्या उपाययोजना, त्यांना याबाबत देण्यात येणारे प्रशिक्षण, जपानमध्ये ३० वर्षापूर्वी आलेल्या भूकंपादरम्यान बचावकार्यात आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर मात करत आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
जे.क्लेर संस्थेचे विशेषज्ञ शिआमि म्हणाले, जपानमध्ये भूकंप ही मोठी समस्या आहे. येथे भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवतात आणि येथील रहिवाश्यांना याबाबत आधीच सूचना देण्यासाठी १० सेकंदाच्या आत अलर्ट पाठविला जातो. या १० सेकंदात त्यांना घरातील वीज, गॅस, पाण्याचे स्त्रोत आदी बंद करण्याबाबत कळविण्यात येते. तसेच वेळोवेळी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जात असून आपत्कालीन परिस्थितीत सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवून जिवीत हानी टाळण्याचा आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असतो.
याव्यतिरिक्त, भूकंप किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना तसेच नागरिकांसमवेत मिळून राबविण्यात आलेली जनजागृती मोहिम आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी मॉकड्रील यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती देखील शिआमि यांनी यावेळी दिली.
दरम्यान, प्रशिक्षणाच्या दुपारच्या सत्रात जे क्लेर संस्थेच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राची पाहणी केली.
What's Your Reaction?