डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवणे अधिक गरजेचे; वाचन संस्कृती रुजविण्यासाठी येत्या काळात महापालिका उपक्रम राबविणार- विजयकुमार खोराटे
पिंपरी, दि.१४ जानेवारी २०२५ – पुस्तक वाचनाने मनुष्याचे मन आणि मस्तिष्क प्रगल्भ होते. त्यामुळे व्यक्तींच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या जाऊन त्यांचे व्यक्तिमत्व बहरते, विचारक्षमतेला चालना मिळते आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवणे हे अधिक गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत “ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, ग्रंथपाल प्रमुख कल्पना जाधव, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, वर्षा जाधव, राजू मोहन, राजेंद्र आंभेरे, वैशाली थोरात, कांचन कोपर्डे, रामदास जाधव संदेश आगळे,नरेंद्र चिंचवडे, सुवर्णा घोसाळकर, सुरेखा मोरे, अक्षय जगताप, पावन पवार, आशा कुडले यांच्यासह माजी ग्रंथपाल, महाविद्यालांचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, महापालिकेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आणि सामुहिक वाचन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात महापालिकेच्या वतीने साहित्य, कला यासोबतच वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी भव्य अभिनव उपक्रम राबविण्यात येतील. वाचन ही मानवाची मानसिक भूक भागवणारी गरज आहे त्यामुळे वाचन संस्कृती तरुणांमध्ये रुजावी यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांना या उपक्रमामध्ये सहभागी करून उपक्रम राबविण्यात येतील.
रंगनाथ नाईकडे म्हणाले, संतांनी आणि महामानवांनी आपले विचार आणि तत्वज्ञान मराठी भाषेत लिहिले असून त्यांच्या नंतरही त्यांचे विचार पुस्तकाच्या रूपाने समाजात जिवंत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वैश्विक कल्याणाचा मुलभूत विचार ज्ञानेश्वरी आणि पसायदानाच्या माध्यमातून मांडला. त्यांनी तत्कालीन लोकभाषेत विचार मांडल्याने ते विचार इतक्या शतकानंतरही जनमानसात जिवंत आहेत, असेही ते म्हणाले. पुस्तकामुळे विचारांचे एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमण होते, त्यामुळे पुस्तक वाचन हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्साह शिगेला ; 'पर्पल सॉल्व्हथॉन २०२५' स्पर्धेत ५० संघ होणार सहभागी
बबन जोगदंड म्हणाले, पुस्तकांमुळे माणूस घडतो, प्रत्येक व्यक्तीने दररोज थोडे वाचन करायला हवे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. एका व्यक्तीचे जीवन चरित्र म्हणजे एका व्यक्तीचा जीवनभरचा प्रवास असतो. पुस्तकामुळे आपल्याला व्यक्तींचे दशकांचे जीवन अनुभव काही तासात अनुभवता येतात. त्यामुळे आपल्या अनुभवात वृद्धी होऊन व्यक्तीचा वैचारिक आणि मानसिक विकास होतो. पुस्तके स्वतः शांत राहतात पण जी लोक त्या पुस्तकांना वाचतात, त्यांना ते बोलायला शिकवतात.
यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते “ग्रंथ प्रदर्शन” दालनाचे उद्घाटन करण्यात आले. पसायदान आणि भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने व्याख्यानाला सुरुवात झाली. हे ग्रंथ प्रदर्शन आज आणि उद्या सायं. ६ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे. नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केले आहे.
ग्रंथपाल प्रमुख कल्पना जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गायकांबळे यांनी तर आभार प्रदर्शन राजू मोहन यांनी केले.
What's Your Reaction?