अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला - महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

Jan 15, 2025 - 08:08
Jan 15, 2025 - 08:08
 0  8
अचूक बिलिंगसाठी सदोष, नादुरुस्त मीटर तातडीने बदला - महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

पुणेदि. १४ जानेवारी २०२५: ग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी त्वरीत देण्यात यावी. सोबतच महावितरण व वीजग्राहकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त व सदोष वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. १४) दिले.

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये आयोजित पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे), श्री. धर्मराज पेठकर (बारामती), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर), प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले, की वीजग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटचे बिलिंग होणे आवश्यक आहे. मात्र नादुरुस्त किंवा सदोष वीजमीटरमुळे महावितरण व ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. वीजग्राहकांना मासिक वीजवापर देखील अचूक कळत नाही. त्यामुळे प्राधान्याने नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यास वेग देण्यात आला आहे. नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नादुरुस्त, सदोष वीजमीटर तातडीने बदलण्यात यावेत, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.  

वीजबिलांच्या वसूलीमध्ये सुमारे ८५ ते ९० टक्के वीजग्राहक नियमित वीजबिल भरतात. मात्र उर्वरित १० ते १५ टक्के ग्राहक वीजबिल भरण्याकडे दरमहा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. अशा थकबाकीदार ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून थकबाकी व चालू वीजबिल वसूलीवर भर द्यावा. प्रामुख्याने उच्चदाब वर्गवारीमध्ये ग्राहकांकडे थकबाकी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांची थकबाकी महावितरणकडे जमा असलेल्या अनामत रकमेएवढी झाल्यास वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याची कार्यवाही करावी असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, राज्याच्या वीजक्षेत्रात महावितरणची आश्वासक वाटचाल सुरु आहे. ऐन हिवाळ्यात शनिवारी (दि. ११) २५ हजार ८०८ मेगावॅट विजेची विक्रमी मागणी होती. ती पूर्वनियोजनामुळे अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण करण्यात आली. अन्य राज्यांच्या तुलनेत महावितरणकडून सर्वाधिक मागेल त्यांना सौर कृषिपंप देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे सोबतच प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक वीजदर देखील कमी होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या वेगवान अंमलबजावणीसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाशी समन्वय ठेवावा असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.  

या बैठकीला अधीक्षक अभियंते सर्वश्री विजयानंद काळे, अरविंद बुलबुले, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी, अनिल घोगरे, संजीव नेहेते, गणपत लटपटे, दीपक लहामगे, भाऊसाहेब हळनोर, चंद्रशेखर पाटील, पुनम रोकडे, सुरेश सवाईराम (प्रभारी), साईप्रकाश आरळी (प्रभारी) आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फोटो नेम  Hon CMD Sir Review Meet Pune 14-01-2025

फोटो ओळ- पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पुणे प्रादेशिक विभागाचा आढावा घेतला. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंते श्री. राजेंद्र पवार, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर उपस्थित होते.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow