आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी व सर्वसाधारण सभेत दिली मंजूरी
चिंचवडकडे जाणाऱ्या नागरिकांची होणार सोय
पिंपरी : चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गादरम्यान असलेल्या लोहमार्गावर नवीन पूल उभारण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (३ डिसेंबर २०२४) झालेल्या स्थायी व सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली आहे.
पिंपरी चिंचवड मनपाच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या स्थायी समितीची सभा झाली. या सभेमध्ये स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
चिंचवड येथील रेल्वेवरील वाहतुकीसाठी दोन समांतर रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. त्यापैकी चिंचवड स्टेशनवरुन चिंचवड गावाकडे जाताना उजव्या बाजुकडील पूल नवीन आहे. तसेच, डाव्या बाजुकडील पूल हा जुना आहे. जुन्या पुलाचे आयुर्मान संपत आले असल्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने या पुलाची पाहणी करण्यात आली होती. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तज्ज्ञ संस्थेकडून करून घेण्यात आले होते. या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महानगरपालिकेने आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरींग यांच्यामार्फत त्रयस्थपणे छाननी करून घेतला होता. त्यातच भारतीय रेल्वे विभागाने देखील पिंपरी चिंचवड महापालिकेला संबंधित पुलाच्या स्लॅबवरील डेड लोड कमी करणेबाबत पत्र पाठवले होते.
दरम्यानच्या काळात पुलाच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटचे सादरीकरण महानगरपालिका आयुक्त यांच्यासमोर करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाबाबत निष्कर्ष काढणे, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेचे शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीची बैठकीत स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल व रेल्वे विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार काही उपाययोजना सूचवल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेने पुलाच्या स्लॅबवरील डेड लोड कमी केला. तसेच जुन्या पुलाची स्थिती पाहता तो अवजड वाहतूक, बस यांच्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. या पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
चौकट
नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणार नवीन पूल
जुन्या पुलावरून बस वाहतूक बंद असल्यामुळे चिंचवडकडे जाणाऱ्या बसेस आणि अवजड वाहने दळवी नगरमार्गे वळसा घेऊन जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी जुन्या पुलावरून अवजड वाहतूक सुरू करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून महानगरपालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीस अनुसरून महानगरपालिका आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सदर पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिने रेल्वे विभागाशी सल्लामसलत करुन नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधणेसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली. रेल्वे विभागाने देखील सदर पुलाबाबत महानगरपालिकेस अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायामध्ये रेल्वे विभागाने सदरचा पूल जीर्ण झाला असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टिने महानगरपालिकेने नवीन पूल बांधवा, असे सुचीत केले होते. अखेर समितीचा अहवाल, रेल्वे विभागाचा पूल नवीन बांधण्याचा अहवाल, लोकप्रतिनिधी यांची पुलावरील जड वाहतुक चालू करण्याची मागणी या सर्व बाबींचा विचार करता हा जुना पूल पाडुन तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी व सर्वसाधारण सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नविन पुल बांधणे व पुलाचे कामासाठी सल्लागार नेमण्याचे कामास मंजुरी दिली आहे.
चौकट - २
पाच ते दहा वर्ष वाढले पुलाचे आयुष्य
पिंपरी येथील उड्डाणपुलाचे रेल्वेच्या सल्ल्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सदर काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम झाल्यामुळे पुलाचे आयुर्मान देखील ५ ते १० वर्षांनी वाढले आहे. आता या पुलाबाबत भविष्यात पाच वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून रेल्वे विभागाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी येथील पूल पाडण्याची सूचना किंवा लेखी पत्र रेल्वे विभागाकडून प्राप्त झालेले नाही.
"सल्लागारा मार्फत अंदाजपत्रक तयार करून रेल्वेच्या खात्याच्या मान्यतेनंतर निविदा कार्यवाही पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. तसेच कामासाठी आवश्यक आर्थिक तरतुद करणेत येत आहे."
- प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग
What's Your Reaction?