मालमत्ता धारकांनी डिसेंबर अखेर कराचा भरणा करावा; अन्यथा आपली मालमत्ता जप्तीस पात्र ठरणार!

डिसेंबरअखेर कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांना 2 जानेवारी पासून जप्ती पूर्व नोटीस बजाविण्यात येणार

Dec 30, 2024 - 08:53
Dec 30, 2024 - 08:57
 0  29
मालमत्ता धारकांनी डिसेंबर अखेर कराचा भरणा करावा; अन्यथा आपली मालमत्ता जप्तीस पात्र ठरणार!

पिंपरी : पिंपरी - चिंचवड शहरामध्ये ६ लाख ३० हजार २९४ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये ४ लाख ०८ हजार २२३ मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत ५५९ कोटींचा कर भरला आहे. करसंकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे बिल पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच पोहोचविण्यात आले. यामध्ये ज्यांच्याकडे मार्च २०२४ पुर्वीची थकबाकी आहे. अशा थकबाकीदारांना बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस सुध्दा बजाविण्यात आल्या आहेत. एप्रिल ते जून अखेर ३ लाख ५३ हजार ६६७ इतक्या मालमत्ताधारकांनी जागरुकपणे कर भरुन विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांपैकी ज्यांच्याकडे फक्त चालू वर्षाचा कर येणे बाकी आहे अशा ५०,५२६ इतक्या मालमत्ता आहेत. सदर मालमत्तांपैकी १०,९५१ मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत १०.७८ कोटींचा कर भरला असून ३९,५७५ मालमत्ताधारकांनी अद्यापही चालू वर्षाच्या कराचा भरणा केलेला नाही. चालू आर्थिक वर्षाच्या देय मालमत्ताकर बिलातील पहिली सहामाहीची रक्कम सप्टेंबर अखेर व दुसऱ्या सहामाहीची रक्कम ३१ डिसेंबर पुर्वी भरण्याची मुदत आहे. याविहित मुदतीनंतरही ज्या मालमत्तांनी कराचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ता जप्ती कारवाईस पात्र ठरतात.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

करसंकलन विभागाने नुकतीच प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या प्रशासन अधिकाऱ्यांची करवसुलीसाठी आढावा बैठक घेऊन प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या थकबाकीदारांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नियमितपणे कर भरणाऱ्या व कोणत्याही प्रकारची थकबाकी नसणाऱ्या ३९,५७५  मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबर अखेर कराचा भरणा न केल्यास अशा मालमत्तांना २ जानेवारी २०२५ पासून जप्तीपूर्व नोटीस बजाविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या मालमत्ता १ जानेवारी २०२५ पासून जप्ती कारवाईस पात्र असणार आहेत. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबर पूर्वी मालमत्ता कराचा भरणा करावा. अन्यथा ९ जानेवारी पासून अशा मालमत्तांचे मालमत्ता जप्तीचे अधिपत्र काढण्यात येऊन त्या मालमत्ता कोणत्याही वेळी जप्त करण्याचे अधिकार करसंकलन विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर १३ जानेवारी पासून मालमत्ता जप्तीची प्रत्यक्ष कारवाई सुरु करण्यात येणार आहे. असे संबंधित करसंकलन विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारवाईची कार्यवाही करण्याचे करसंकलन विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. 
करसंकलन विभागाकडून सध्या ३ लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले असून अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी जप्ती मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच, फक्त चालू वर्षाचा मालमत्ता कर डिसेंबर अखेर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता देखील जानेवारी पासून थकबाकीदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून सदर मालमत्तासुध्दा मालमत्ता जप्तीस पात्र होणार आहेत. करसंकलन विभागाकडून सध्या मालमत्ता जप्तीची मोहिम, वाढणारे विलंब शुल्काबाबत विभागाकडून वेळोवेळी माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यासोबतच एसएमएस, टेलिकॉलिंग, सोशल मीडियासारख्या आदी माध्यमातून कळविण्यात येत आहे. तरी, मालमत्ताधारकांनी त्वरीत मालमत्ताकराच्या थकीत रकमेचा भरणा करुन मालमत्ता जप्तीची कटू कारवाई व प्रतिमहिना वाढणारे २ टक्क्यांचे विलंब शुल्क टाळण्याचे आवाहनसुध्दा करसंकलनन विभागाकडून करण्यात आले आहे.

कोट – 
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांमध्ये नियमितपणे कर भऱणाऱ्या करदात्यांनी कायमच करसंकलनामध्ये मोलाटा वाटा उचलला आहे. परंतू अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ताधारकांनी ३१ डिसेंबर रोजीपर्यंत आपल्या कराचा भरणा करुन वाढणारे २ टक्क्यांचे विलंब शुल्क व मालमत्ता जप्तीची कारवाई टाळून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.”
-    प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कोट – 
“करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना विविध माध्यमातून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये अद्यापपर्यंत ४ लाख ०८ हजार २२३ इतक्या मालमत्ताधारकांनी जागरुकपणे कराचा भऱणा केला आहे. करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यासाठी मालमत्ता जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. नियमितपणे कर भरणाऱ्या तब्बल ३९,५२६ मालमत्तांनी ३१ डिसेंबर अखेर कराचा भरणा करावा  अन्यथा विभागाकडून सदर मालमत्तांना जप्तीपूर्व नोटीस बजाविण्यात येऊन कराचा भऱणा करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात येऊन त्यानंतरही कर न भरणाऱ्यांचे जप्ती अधिपत्र काढून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. नागरिकांनी ३१ डिसेंबर अखेर आपला कर भरुन कारवाई टाळावी”
-    अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow