स्मार्ट सारथीवरील नागरिकांच्या तक्रारी योग्य कार्यवाही न करता बंद केल्यास होणार कठोर कारवाई!

आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा, सर्व विभागप्रमुखांना तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्याचे आदेश

Dec 12, 2024 - 15:04
Dec 12, 2024 - 15:04
 0  8
स्मार्ट सारथीवरील नागरिकांच्या तक्रारी योग्य कार्यवाही न करता बंद केल्यास होणार कठोर कारवाई!

पिंपरी, दि. १२ डिसेंबर २०२४ - शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवून एकूणच पायाभूत सुविधांची पुर्तता करून राहणीमान सुधारण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, व नागरिकांना या सेवांमुळे मिळणारे समाधान आणि महानगरपालिकेचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व जोपासण्यासाठी, महानगरपालिकेने सर्वसमावेशक यंत्रणा सुरू करुन स्मार्ट सारथी तक्रार निवारण प्रणालीमध्ये सकारात्मक बदल केले आहेत. यापुढे सारथीवर आलेल्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही झाल्याबाबत तक्रारदारालाच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करण्यात येणार आहे. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्यात येणार आहे.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून निवारण करून ती बंद केल्यानंतर त्याबाबत संबंधित तक्रारदाराचे समाधान झाले की नाही, यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सेवा वितरणातील तफावत ओळखण्यासाठी महानगरपालिकेकडून तक्रारदाराला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय घेण्यात येणार आहेत. याचबरोबर, नागरिकांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास संबंधितांची चौकशी किंवा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच समस्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे.

घरमालकीचे स्वप्न साकार करण्यासाठी पिंपरी महापालिकेने घरकुल योजना सुरू केली आहे

# मागील महिन्यामध्ये ८,०७६ तक्रारींचे निरसन
चालू वर्षातील १ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर याकालावधीमध्ये महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथीद्वारे नागरिकांनी नोंदविलेल्या एकूण ८,०७६ तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत. यामधील ५,३४९ तक्रारदारांचे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय घेण्यात आले असून ६३ टक्के तक्रारदारांनी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तर यामधील ८ टक्के तक्रारदारांनी असमाधान व्यक्त केले असून त्यामधील २ टक्के तक्रारदारांनी तक्रारी कोणत्याही कारवाईशिवाय बंद केल्या असल्याचे सांगितले आहे. तसेच २९ टक्के तक्रारदारांना त्यांच्या समस्या दूर झाल्याबाबत दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

# …तर, अशा तक्रारींची पुन्हा दखल घेणार
गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथीवर तक्रारी नोंदविल्या आहेत आणि ज्या नागरिकांच्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही न करता त्या बंद केल्या गेल्या आहेत ते नागरिक त्यांची तक्रार पुन्हा स्मार्ट सारथीवरून उघडू शकतात. त्यानंतर संबधित तक्रारीवर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी ती वरिष्ठ अधिकारी किंवा विभागप्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. स्मार्ट सारथीद्वारे येणाऱ्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची पूर्णपणे काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.    

# तक्रारींच्या पॅटर्नचे केले जाणार विश्लेषण
महानगरपालिकेकडून नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींचे विस्तृत विश्लेषण केले जाणार असून एखाद्या परिसरातून अधिकच्या तक्रारी का येतात, याचा देखील अभ्यास केला जाणार आहे. तसेच तक्रारींचा पॅटर्न लक्षात घेऊन त्यावर विश्लेषण करून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर कार्यवाही करण्यावर महापालिका भर देणार आहे. यामुळे तक्रारींचे निवारण करण्यासोबतच नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यास मदत मिळणार आहे.

* नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई 
स्मार्ट सारथीद्वारे आलेली कोणतीही तक्रार योग्य कार्यवाही न करता बंद केली, तर ती तक्रार पुन्हा सारथीवर उघडली जाईल आणि सक्तीने पुन्हा त्या विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. शिवाय तक्रारदाराला समस्येचे निराकरण झाले की नाही याबाबत विचारणा करण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांनी तक्रारींचे वेळेवर आणि प्रभावीपणे निराकरण करणे अपेक्षित आहे. निराकरण केल्याशिवाय कोणतीही तक्रार बंद केल्याचे आढळल्यास सदर तक्रारीवर योग्य प्रकारे कार्यवाही होईपर्यंत त्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांनी केलेल्या तक्रारी यापुढे निराकरण न करता बंद करण्यात आल्यास संबंधिताची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यासाठी महानगरपालिका सदैव तत्पर असून नागरिकांचे हित हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow