समारोप-अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सत्र

Jan 18, 2025 - 08:07
Jan 18, 2025 - 08:08
 0  8
समारोप-अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सत्र

पिंपरी चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५ दिवसीय अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षणाचा वापर निश्चितपणे होईल,  या प्रशिक्षणात देण्यात आलेल्या जपानी तंत्रज्ञानाचा कृतीशील वापर बचावकार्यात करावा,  तसेच पिंपरी चिंचवड शहरात जपानमधील आपत्ती व्यवस्थापन पद्धतींमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे  अदान प्रदान करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

          पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १३ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत चिंचवड येथील विज्ञान केंद्र येथे स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर येथील प्रतिनिधी कार्यालयाच्या सहकार्याने ५ दिवसीय अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या समारोपावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.  

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर,संदीप खोत,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, भारतीय सैन्य दलातील युनिट  २४ मराठा  रेझीमेंट येथील अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

 

          महापालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी कर्मचारी  तसेच प्रशिक्षणार्थी यांना शहरासाठी विशिष्ट आपत्ती व्यवस्थापन प्रोटोकॉल आणि शहर आपत्ती व्यवस्थापन योजनेची निर्मिती करणे, आपत्ती प्रतिसादासाठी अंमलबजावणी रणनीती आखणे, अग्निसुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे तसेच विविध आपत्कालीन प्रतिसाद संस्थांमधील समन्वय अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 

आयुक्त म्हणाले, जपानी तज्ञांचे हे सहकार्य पिंपरी-चिंचवड शहराला आपत्ती-प्रतिबंधक शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत, जागतिक हवामानातील बदल आणि जलद शहरीकरणामुळे आमच्या प्रयत्नांना लक्षणीयरीत्या गती देणे आवश्यक आहे. या ५ दिवसीय प्रशिक्षणात अधिकारी कर्मचारी यांनी आत्मसात केलेले ज्ञान आणि तंत्र हे  आमची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. येत्या काही महिन्यांत जे.क्लेर संस्थेसोबत तांत्रिक सहाय्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी उत्सुक आहोत.  

यावेळी जपानच्या जे.क्लेर संस्थेचे विशेषज्ञ शिआमि यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ५ दिवसात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणातील संक्षिप्त माहिती दिली. तसेच जे.क्लेर संस्थेचे प्रतिनिधी यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आला.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow