वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे’ला वाढता प्रतिसाद ;सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल १७७ कोटींचा भरणा
वॉलेटधारकांना मिळाले ८० लाखांचे कमिशन तर वीजग्राहकांनाही सुविधा
पुणे : निमशहरी व ग्रामीण भागात वीजबिल भरणे सोयीचे करणाऱ्या तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला प्रामुख्याने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत १६ लाख ६ हजार ६६२ वीजग्राहकांनी १७७ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशनपोटी वॉलेटधारकांनाही ८० लाख ३३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत ६०१ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले आहे.
ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय / उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.
‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३२ वॉलेटधारक असून गेल्या सहा महिन्यांत ७ लाख १५ हजार ४६५ ग्राहकांनी वॉलेटमधून ७२ कोटी ९७ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. तर वॉलेटधारकांना ३५ लाख ७७ हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असून जिल्ह्यातील ८३ वॉलेटधारकांना २९ लाख ४ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यात १ लाख ६ हजार ६० वीजग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात ९१ हजार ८३५ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १२ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात ५१ वॉलेटधारकांना ४ लाख ५९ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील १ लाख १२ हजार ३५८ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १६ कोटी ९६ रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ५६ वॉलेटधारकांना ५ लाख ६१ हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.
आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.
फोटो – Mahapower Pay
What's Your Reaction?