पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक रिसायकलिंगचा नवीन उपक्रम

जबाबदार कचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल

TDNTDN
Dec 18, 2024 - 06:42
Dec 18, 2024 - 06:43
 0  7
पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक रिसायकलिंगचा नवीन उपक्रम

पिंपरी, दि. १७ डिसेंबर २०२४ – पर्यावर्णीय शाश्वततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व  सँडविक कोरोमंट इंडिया यांच्या सीएसआर पाठिंब्याने आणि थिंकशार्प फाऊंडेशनच्या सहकार्याने सहा प्रमुख ठिकाणी प्रगत प्लास्टिक रिसायकलिंग वेंडिंग मशीन बसवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

या अत्याधुनिक मशिन्सद्वारे नागरिकांना प्लास्टिकच्या बाटल्या जबाबदारीने योग्य ठिकाणी टाकण्याची सोय मिळेल. त्या बाटल्या क्रश करून त्याचा वापर सेफ्टी जॅकेट्स, टाईल्स, पेन व बेंचसारख्या उपयुक्त उत्पादनांमध्ये पुनर्वापर करण्यासाठी केला जाईल. या प्रक्रियेसाठी द शक्ती प्लास्टिक इंडस्ट्रीजची मदत घेण्यात येणार आहे. ही योजना प्लास्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि समाजात पुनर्वापर संस्कृती प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या उपक्रमात नागरिकांच्या सक्रिय सहभागाने कचऱ्याचे प्रमाण आणि पर्यावरणावर होणारा हानिकारक परिणाम कमी करण्यास मदत मिळेल.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, हा उपक्रम प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून उपयुक्त ठरणार आहे. यामुळे पुनर्वापराचे महत्त्व नागरिकांमध्ये रुजविण्यास मदत मिळेल. यासोबतच हा उपक्रम शाश्वत, पर्यावरण-जागरुक समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. वाढत्या प्लास्टिक वापराच्या पार्श्वभूमीवर या मशिन्स प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यात, प्रभावी पुनर्वापर उपाय म्हणून शाश्वत उपाययोजनांचे उदाहरण निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

प्रकल्पाचे महत्त्व:

पर्यावरणीय परिणाम: प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करून स्वच्छ आणि हरित पर्यावरण प्रोत्साहित करणे.

जागरुकता निर्माण: नागरिकांना जबाबदार कचरा व्यवस्थापन सवयी आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

नाविन्यपूर्ण पुनर्वापर उपक्रम: प्लास्टिक कचऱ्याचे रूपांतर उपयुक्त उत्पादनांमध्ये करणे, जसे की बेंच, ज्यामुळे पुनर्वापराच्या संधी वाढतील.

सामाजिक सहभाग: पर्यावरण संवर्धनात योगदान देण्यासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे.

हा प्रकल्प सँडविक कोरॉमंट इंडियाच्या सी. एस. आर उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये थिंकशार्प फाऊंडेशनद्वारे व शक्ती प्लास्टिक इंडस्ट्रीजची भागिदारी आहे.

उपक्रमाविषयी:

पिंपरी चिंचवड शहरात सायन्स पार्क , रामकृष्ण मोरे सभागृह, अटलबिहारी वाजपेयी उद्यान, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल व इतर अश्या एकूण ६ प्लास्टिक रिसायकलिंग वेंडिंग मशिन्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे अनावश्यक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या टाकून पर्यावरणाला होणारी हानी नियंत्रणात येईल. हा उपक्रम नाविन्यपूर्ण आणि सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत भविष्य घडवण्याच्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे.

उपक्रमाच्या सामंजस्य करारावेळी आयुक्त शेखर सिंह, सँडविक कोरॉमंट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीएफओ किरण आचार्य, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी व सी.एस.आर सेल प्रमुख निळकंठ पोमण, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे थिंकशार्प फाऊंडेशनचे संस्थापक संतोष फड, सुश्री रोशनी आचार्य, सी.एस.आर सल्लागार श्रुतिका मुंगी आदी उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow