काँग्रेसने देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान केला : रावसाहेब दानवे पाटील

नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांचा सत्कार

Dec 14, 2024 - 13:29
Dec 14, 2024 - 13:41
 0  17
काँग्रेसने देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान केला : रावसाहेब दानवे पाटील

पिंपरी (पुणे ): भाजप प्रणित केंद्र सरकार संविधान बदलतील असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच देशांमध्ये आतापर्यंत ७२ वेळा संविधानात बदल केला. १९७५ मध्ये देशामध्ये आणीबाणी संविधानाचा अवमान केला. संविधान निर्मितीचे काम केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत दोन वेळा पाडण्याचे काम काँग्रेसने केले, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी शुक्रवारी केली. 


भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप यांचा शाल, श्रीफळ, पगडी आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माजी महापौर माई ढोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, कार्यकारी अध्यक्ष बापू काटे, चंद्रकांत नखाते, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, आरपीआयचे अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, विजय फुगे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, कैलास कुटे, गणेश लंगोटे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुणे पोलिसांनी तांत्रिक प्रगती स्वीकारण्याचे आवाहन


दानवे म्हणाले की, विरोधकांकडून आमच्यावर ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकमध्ये आम्हाला अपयश आले होते. मग तेव्हा ईव्हीएम घोटाळा झाला नव्हता का? माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे भाजपाला जातीयवादी म्हणतात. त्यांनी १९९५ मध्ये आमच्या सोबत युती केली होती. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील एकेकाळी भाजप सोबत युती केलेली आहे. मात्र त्यांना आत्ताच आम्ही कसे जातीयवादी वाटायला लागलो, पदे घेताना वाटलो नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला उद्देशून रावसाहेब दानवे म्हणाले, ना शिवसेना शिल्लक राहील ना राष्ट्रवादी काँग्रेस. भाजपाचे एकेकाळी २ खासदार होते. त्याचे आता ३०२ खासदार झालेत. 

कपडे शिवून ठेवा, अचानक निरोप येऊ शकतो....

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी एकाला मंत्रिपद द्या, अशी मागणी कार्यक्रमादरम्यान पदाधिकाऱ्यांनी केली. हाच धागा पकडून रावसाहेब दानवे हे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांना उद्देशून म्हणाले, भाजपमध्ये धक्कादायक निरोप येतात.  कपडे शिवून ठेवा. अचानक निरोप येवू शकतो. पुढील काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार आहे.

महापौर भाजपचा होणार...

आगामी महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी, अशी भूमिका पदाधिकारी यांनी यावेळी मांडली. तसेच भाजपचा महापौर होईल असा, दावा ही करण्यात आला. त्यावर दानवे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकदिलाने काम करा, आपला विजय निश्चित आहे. ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव ढाके यांनी केले. आभार संजय मंगोडेकर यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow