पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग तातडीने हटवावे- आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. ७ जानेवारी २०२५: पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती, घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी साहित्य तातडीने हटवावे, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स, गॅन्ट्री आदी विरुद्ध योग्य कार्यवाही करण्याबाबत पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ चे कलम ३ तसेच महाराष्ट्र अधिनियमातील कलम २४४ (१) (२) (३), २४५(१) (२) आणि महानगरपालिका आकाशचिन्ह तसेच जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण करणारे नियम दिनांक ९ मे २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार तरतुदी निर्गमित करण्यात आल्या असून या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी उभारण्यात आले असल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या बैठकीस उपस्थित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी विविध सूचना दिल्या, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी विरुद्ध संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी. तसेच पर्यवेक्षणासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपआयुक्त यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहावे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदी अनधिकृत बाबींना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांची एक समिती संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी गठीत करावी, तसेच याबाबत व्यापक जनजागृती करावी, अनधिकृत रित्त्या उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील पदार्थाचा वापर केला असल्यास संबधितांवर क्षेत्रीय अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करावी, महापालिकेद्वारे संबंधित कार्यक्षेत्रामध्ये नविन जाहिरात फलक उभारणे तसेच पुर्वी दिलेल्या जाहिरात फलकाचे नुतनीकरण केले जाते. याबाबतचे प्रस्ताव संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल केले जातील त्यावर संबंधित परवाना निरीक्षक स्थळपाहणी करून क्षेत्रीय अधिकारी स्थळ पाहणी अहवाल सादर करतील त्यानुसार प्रस्तावाची तपासणी करून क्षेत्रीय अधिकारी यांनी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव आकाशचिन्ह व परवाना विभागप्रमुखांकडे मंजुरीसाठी सादर करावे असे आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या कमानी, मंडप, झेंडे, फलक याबरोबरच खाजगी तथा मार्वजनिक जागेवर लावण्यात आलेले अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, फ्लेक्स, पोस्टर, किऑक्स, गॅन्ट्री आदीवावत मंबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी उचित कार्यवाही करावी, अशा सर्व कार्यवाहीचे फोटोग्राफी, चित्रीकरण व पंचनामे करून ते संग्रही ठेवावे, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील अनधिकृत फ्लेक्स, जाहिराती- घोषणा फलक, पोस्टर्स, किऑक्स गॅन्ट्री आदीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक ८८८८००६६६६, एस एम एस आणि व्हॉटस अॅपसाठी ९८२३११८०९० हा क्रमांक असून सारथी हेल्पलाईन ०२० – ६७३३३३३३ किंवा ०२०- २८३३३३३३ या द्वारे नागरिक तक्रार दाखल करू शकतात. तसेच छायाचित्रासह तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेद्वारे होर्डिंग तसेच जाहिरातींचे फ्लेक्सवर परवाना क्रमांक, परवाना कालावधी, परवान्याचे ठिकाण आणि क्यू आर कोड आदी ठळकपणे दिसेल अशा दर्शनी ठिकाणी संबधित परवाना धारकास बंधनकारक आहे. याबाबत योग्य खातरजमा संबधित अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात विविध कामांसाठी तसेच विविध सणांच्या दरम्यान तात्पुरते बूथ किंवा मंडप उभारण्याची परवानगी देतेवेळी त्यावर कुठलेही होर्डिग अथवा जाहिराती लावता येणार नाहीत. या अटीचे उल्लंघन केल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कुठल्याही व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणतेही कोणतेही कार्यक्रम किंवा सण यानिमित्त लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर कार्यक्रमाच्या दिनांकापुर्वीच निष्कामित करावेत.
शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे आणि जाहिरात प्रदर्शनाचे नियमन व नियंत्रण करणारे नियम दिनांक ०९ मे २०२२ रोजी जाहीर केले आहे. त्यामधील तरतुदी सर्व संबधितांस बंधनकारक आहेत.
संबधित जाहिरात फलकांबाबची परवाना फी, प्रक्रिया फी, विलंब शुल्क तसेच त्यानुषंगिक इतर शुल्क आकारणी आदीबाबतची कार्यवाही आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत करण्यात येणार आहे.
महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात येणारे आणि पूर्वी परवाना दिलेल्या जाहिरात फलकांचे नुतनीकरणाचे दर खालीलप्रमाणे असणार आहेत.
परवाना शुल्क = (जाहिरात फलक मोजमाप रक्कम रुपये ६५/- प्रती स्क्वेअर फुट X १.२५ (झोन प्रिमीअम शुल्क) X १.५ (रोड प्रिमिअम)
प्रशासकिय शुल्क - परवाना शुल्कावर ५ टक्के प्रति वर्ष
याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?