चिंचवड विधानसभा मतदारसंघात हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला

चिंचवड विधानसभा मतदारसंघात हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला

TDNTDN
Nov 20, 2024 - 19:17
 0  57
चिंचवड विधानसभा मतदारसंघात हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला

थेरगाव, दि. २० नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघात वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सकाळी ७ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाले आहे. तर मतदान यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. 

मतदारसंघातील दर दोन तासांची सरासरी मतदान टक्केवारी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८० टक्के मतदान झाले. तर सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात वाढ होऊन ते १६.९७ टक्के इतके झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २९.३४ टक्के इतके झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४०.४३ टक्के मतदान पार पडले. ५ वाजेपर्यंत सरासरी ५०.०१ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते. 

कंट्रोल रुमद्वारे लक्ष
चिंचवड विधानसभा मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता.  निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली. 

चिंचवड मतदारसंघात हरित मतदान केंद्र आणि महिला संचालित केंद्र ठरले मतदारांचे आकर्षण
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रे विशेष स्वरूपात सजविण्यात आली होती. यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड येथे महिला संचालित मतदान केंद्र, बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नवी सांगवी येथे युवा संचलित मतदान केंद्र, महात्मा फुले इंग्रजी माध्यम विद्यालय, प्रेमलोक पार्क येथे दिव्यांग मतदान केंद्र, पीके इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळे सौदागर येथे युनिक मतदान केंद्र तर सिटीप्राईड स्कूल, रावेतगाव मॉडेल मतदान केंद्र या केंद्रांचा समावेश होता. त्यामध्ये महिला संचालित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवी सांगवी, सिटीप्राईड स्कूल रावेतगाव, जीके गुरूकूल पिंपळेसौदागर, पिंपरी चिंचवड महापालिका शाळा क्र. ५४/१ पिंपळेगुरव याठिकाणी हरीत मतदान केंद्रे साकारण्यात आली होती. या हरित मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना विविध जातीच्या वनस्पती तसेच वृक्षांच्या प्रजातींबद्दल माहिती जाणून घेतली, तसेच यावेळी त्यांना तुळशीच्या रोपांचे वाटपही करण्यात आले. 

मतदारांसाठी विविध सोयीसुविधा
प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह  वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या अशा विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले. 

मतदारांसाठी सेल्फी पॉइंट्स
मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. 

मतदान केंद्रावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सुरक्षितपणे नेमून दिलेल्या स्थळी घेऊन येण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सर्व सेक्टर ऑफिसर आणि केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना दिली. मतदान यंत्रे संकलित करून थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्रॉन्ग रूम) येथे सुरक्षित जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow