पर्पल जल्लोष कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी
नागिरकांसाठी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवाणी
पिंपरी, दि. १६ जानेवारी २०२५ – पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव या कार्यक्रमात दिव्यांग कवींचे संमेलन, गझलरंग, कथाकथन, परिसंवाद, फॅशन शो, मिरॅकल ऑन व्हील्स, नृत्य, वाद्यवादन फिल्म फेस्टिव्हल, गायन, चर्चासत्र अशा विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक तसेच माहितीपर कार्यक्रमांची मेजवाणी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्पल जल्लोष कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
दि. १७ ते १९ जानेवारी या कालावधीत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात सकाळी १० ते सायंकाळी ९ पर्यंत विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध सेवासुविधांच्या प्रदर्शनासह कलागुण आणि प्रतिभांचा अविष्कार असलेल्या पर्पल जल्लोष या कार्यक्रमाची सुरूवात १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चिंचवड येथील सायन्स पार्क ते ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रापर्यंत काढण्यात येणाऱ्या जल्लोष दिंडीद्वारे होणार असल्याची माहिती देखील आयुक्त सिंह यांनी दिली.
कार्यक्रमाच्या मुख्य सभामंडपामध्ये १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दिव्यांग नव कवींच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सचिन वाघमारे, लतिका उमप, सुशिला आवलोळ, सुप्रिया यादव, दीपीका क्षीरसागर, गणेश निकम, ऋचा पत्की, राकेश खैरनार, नवनाथ भारभिंगे हे कवी सहभागी होणार आहेत. कवीसंमेलनानंतर १०.४५ वाजता गप्पा लेखकांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लेखिका आणि अनुवादक सोनाली नवांगूळ, ज्येष्ठ साहित्यिक सुधीर देवरे, लेखक बापू बोभाटे यांचा सहभाग असणार आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता गझलरंग या मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून या मैफिलीमध्ये विजय आव्हाड, निर्मिती कोलते, विश्वजीत गुडधे, डॉ. कृष्णा राऊत यांचा सहभाग असणार आहे. तसेच यावेळी दिवंगत नाना बेरगुडे यांच्या गझलांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात १२.१५ वाजता अजित कुंठे, सुमित जाधव, रेवणनाथ कर्डिले हे कथाकथन सादर करणार आहेत. त्यानंतर २ वाजता निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये भूषण तोष्णीवाल, संजय पवार, धम्मपाल बाविस्कर, गणेश खरात, बापुराव खरात, राजेंद्र लाड, नरेश शिंदे, केशरचंद राठोड, अहमद शेख या कवींचा सहभाग असणार आहे. तर दुपारी ३ वाजता चित्रपट, साहित्य आणि दिव्यांगत्व या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंकज साठे, राजेश्वरी किशोर यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी दिव्यांगांच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर ६.३५ वाजता दिव्यांगांद्वारे सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम – मिरॅकल ऑन व्हील्स या कार्यक्रमाने सभामंडपातील कार्यक्रमांचा शेवट होणार आहे.
१८ जानेवारी रोजी शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शहरातील विविध शाळा, विद्यालये सहभागी होणार आहेत. तर १९ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दिव्यांगांच्या जीवनावर आणि यशोगाथेवर चित्रित झालेले जागतिक पातळीवरील विविध चित्रपट, माहितीपट, लघुपटांचे सादरीकरण आणि त्यावर संवादात्मक चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
संवाद सभागृहामध्ये १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग व्यक्तींना सहजतेने जीवन जगण्यासाठीच्या उपाययोजना या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता यु.डी.आय.डी दिव्यांग सर्वेक्षण आणि बालवाडी प्रकल्पाच्या नाविन्यपुर्ण कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता पेडीयाट्रीक टू जेरियाट्रीक थेरपीचे महत्व या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी २.४५ वाजता महिला आणि दिव्यांगत्व तसेच ३.४५ वाजता सर्वसमावेशकता आणि दिव्यांगांना येणारी आव्हाने या विषयांवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून १०.४५ वाजता समानता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक संघटनात्मक उपाय या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार या विषयावरील चर्चासत्र आणि दुपारी १२.१५ वाजता प्रसूती दरम्यान व नंतर दिव्यांगत्वाबाबत तसेच आहाराबाबत घ्यावयाची काळजी या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १२.४५ वाजता मानसिक विकासात कुटुंबाचा सहभाग या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.५५ वाजता तज्ञ डॉक्टर दिव्यांग आणि मेंदूचे आजार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. २.०० वाजता बालपण ते पौगंड अवस्थेतील विकसनात येणारी आव्हाने आणि ३.०० वाजता शीघ्र निदान, शीघ्र उपचार या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता सर्वसमावेशक उच्च शिक्षण आणि एकत्रीकरण या विषयावरील चर्चासत्राने संवाद सभागृहातील दुसऱ्या दिवसाचा शेवट होणार आहे.
१९ जानेवारी रोजी संवाद सभागृहामध्ये सकाळी १० वाजता खेळाद्वारे थेरपी आणि करिअर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ११ वाजता पालकत्व, वास्तव या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता दिव्यांगता आणि समावेशकता या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी १. ४५ वाजता कायद्यांची अंमलबजावणी आणि वकीली या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता सहजता (एक्सेसिबीलिटी) आणि दुपारी ४ वाजता कृती योजना या विषयांवरील चर्चासत्राने संवाद सभागृहामधील कार्यक्रमांचा शेवट होणार आहे.
What's Your Reaction?