पंचकल्याणक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी जैन मुनींचे प्रतिपादन
धार्मिक विधींद्वारे समाजात जागृती करण्याचे प्रयत्न
पिंपरी, ता. १५ : सध्या चंगळवादाकडे चाललेला समाज पाहता, असे वाटते की आपल्याला मिळालेले जीवन हे अमूल्य आहे. ते मूल्यवान कसे करता येईल, हे पहायला हवे. आजपर्यंत आपण काय कार्य केले आणि त्यातले किती व्यर्थ गेले हे आत्मपरीक्षणातून पाहता येईल, असे मत श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज आणि श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज यांनी आज व्यक्त केले.
भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर व श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या समारोप प्रसंगी आज ते बोलत होते. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७-अ नियोजित महापौर निवास मैदान येथे दीवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे व्यासपीठावर हा महोत्सव घेण्यात आला.
श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज म्हणाले, पुण्यकर्म करण्यासाठी पंचकल्याणक महोत्सव केला जातो. हा महोत्सव आपल्या समाजासाठी आहे. आपण जीवनात जे कार्य करतो, ते किती पुण्यवान आहे, हे आपणच आपल्या मनाला विचारायला हवे. तीर्थंकर आदिनाथ महाराज हे जन्मापासूनच पुण्यवान होते. त्यांच्याकडे जन्मापासूनच सुख, समृद्धी, वैभव असे असतानाही त्यांनी दीक्षा घेतली, तप केले. आजच्या युगात आपल्याला भरपूर वैभव मिळते. परंतु, या वैभवामुळे अहंकार निर्माण होतो आणि केलेल्या पुण्याला अहंकाराचे ग्रहण लागते. पुण्यकर्मातून जी मनःशांती मिळते ती वैभवापेक्षा जास्त असते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही पुरुषार्थाची चतुःसूत्री आहे. परंतु, भोगविलास, कोर्टकचेरी, वादविवाद, मनोरंजन, व्यर्थ फिरणे यामध्ये आपण आपले जीवन घालवितो. यासारखे दुर्भाग्य नाही.
श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज म्हणाले की, गेले पाच दिवस केलेला पंचकल्याणक कार्यक्रम हा तीर्थंकरांसाठी नसून तो आपल्यासाठी आहे. नकारात्मक विचार डोक्यातून घालविण्यासाठी गुरुवाणी ऐकली पाहिजे. आचरणात आली पाहिजे. तरच जीवन सार्थकी लागेल. जीवनात आपण धर्मापेक्षा संसाराची चर्चा अधिक करतो. पंचकल्याणक कार्यासाठी सहा महिन्यांचे नियोजन असते. हा एक संकल्प आहे. पंचकल्याणक महोत्सवामुळे जीवनात परिवर्तन झाले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा महोत्सव यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडला आहे.
श्री आदिनाथ यांच्या मूर्तीला पंचामृताभिषेक
हस्तिनापूरच्या ग्यानमती माताजी यांच्याकडून संस्थेला श्री १००८ युगप्रवर्तक आदिनाथ तीर्थंकर भगवान यांची ११ फूट उंचीची मूर्ती भेट मिळाली आहे. नाशिकला मांगीतुंगा येथे १०८ फूट उंचीची अशीच मूर्ती कोरली गेली आहे. त्यासाठी मॉडेल म्हणून वापरण्यात आलेली ही ११ फुटांची मूर्ती आहे. ही मूर्ती समोर ठेवून १०८ फूट उंचीची मूर्ती करण्यात आली. या मूर्तीची सकाळी प्रतिष्ठापना आणि सायंकाळी पंचामृताने मस्तकाभिषेक करण्यात आला. नित्यविधी, लघुशांती, स्तोत्रपठण, संघ पूजा, सत्कार, कंकणविमोचन आदी कार्यक्रम आज दिवसभर झाले. दिवसभर विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महोत्सवात विविध प्रकारे दान करणाऱ्या व्यक्तींचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दिगंबर मुनींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू : खा. बारणे
उमरगा येथील राजेंद्र जैन आणि त्यांच्या चमूंनी विविध नाटिका सादर केल्या. खासदार श्रीरंग बारणे यांनी महोत्सवास भेट दिली. दिगंबर मुनीवर यात्रेसाठी बाहेर पडतात तेव्हा यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये, यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे. सरकारी पातळीवर लवकरात लवकर यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. ही पंचकल्याणक उत्तम शिकवण आहे. समाजापुढे आणले त्याबद्दल कौतुक केले.
माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांनी महोत्सवास भेट दिली. कार्यक्रमाचे नियोजन अजित पाटील, शांतिनाथ पाटील, धनंजय चिंचवडे, प्रकाश शेडबाळे, सुरगोंडा पाटील, संजय नाईक, वीरेंद्र जैन, सुदिन खोत, उमेश पाटील, विनोद वठारे, विजय भिलवडे, शरद आलासे व पार्श्व पद्मावती महिला मंडळ, वीर सेवा दल आणि जैन महिला मंडळ यांनी केले.
What's Your Reaction?