आयटीतील नेरेच्या सरपंचाला ग्रामसभेत जीवे मारण्याची धमकी
तुला एक दिवस तलवारीने तोडतो...!! राजकारणातील वर्चस्वातून एकमेकांमध्ये द्वेष
हिंजवडी(पुणे ) :- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या पाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला हे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असतानाच आयटी पार्क हिंजवडी परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २६) दुपारी घडला.
मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचाराचा धोका
या प्रकरणी नेरे-दत्तवाडीचे सरपंच सचिन चिंतामण जाधव (वय ३६) यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार माजी सरपंच व विद्यमान सदस्या विद्या राहुल जाधव (वय ४०) व त्यांचे पती
राहुल सीताराम जाधव (वय. ४५) दोघां दांपत्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व आरोपी हे राजकीय विरोधक आहेत. गुरुवारी (ता. २६) गावातील भैरवनाथ मंदिरात प्रस्तावित व प्रारूप विकास आराखड्यातील विषयांबाबत चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती.
ग्रामसभेत अजेंड्यावरील विषय सुरु असताना आरोपी अचानक उठून सर्व ग्रामस्थांसमोर बाचाबाची करू लागले. तुम्ही गावात विकास कामाच्या शुभारंभाचे लावलेले बोर्ड आहेत ते काढुन टाका असे म्हणत राहुल जाधव यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तुला एक दिवस तलवारीने तोडतो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर
हिंजवडी पोलिसांनी तात्काळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून सबंधितांना नोटीसीद्वारे समज दिली
आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
चौकट : अन्यथा सरपंच पदाचा राजीनामा देणार
२६ ऑक्टोंबर २०२३ रोजी सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेवेळी पोलिस कर्मचाऱ्यांसमोर या दांपत्यांनी माझ्या अंगावर धावून येत मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेंव्हाचा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद आहे. या दोघांपासून माझ्या जिवाला धोका आहे. वारंवार मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. संबंधितांवर कायदेशीर कडक कार्यवाही व्हावी. अन्यथा मला सरपंचपदाचा राजीनामा दयावा लागेल अशी उद्विग्न कैफियत सरपंच सचिन जाधव यांनी हिंजवडी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारी अर्जात मांडली आहे.
कोट
हा प्रकार समजताच तात्काळ दोन्ही पार्ट्याना बोलावून घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून कायदेशीर समज व प्रतिबंधात्मक नोटीस बजविण्यात आली आहे. पोलीस दफ्तरी कठोर उपाययोजना केल्या जातील.
- कन्हैया थोरात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे
What's Your Reaction?