पवनाथडी जत्रेची आढावा बैठक संपन्न

Feb 14, 2025 - 17:53
Feb 14, 2025 - 17:54
 0  2
पवनाथडी जत्रेची आढावा बैठक संपन्न

पिंपरी, दि. १४ फेब्रुवारी २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.२१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याअनुषंगाने  सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले.   

महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच  विपणन, विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने पवनाथडी जत्रेचा उपक्रम राबविण्यात येत असतो. यावर्षी देखील असा उपक्रम महापालिकेने आयोजित केला आहे.  या उपक्रमाच्या नियोजनासाठी  आज अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील    यांच्या अध्यक्षतेखाली   दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहशहर अभियंता  संजय खाबडे, देवन्ना गट्टूवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र  दादेवार,  उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,  सचिन पवार, अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त  तानाजी नरळे,  उमेश ढाकणे, कार्यकारी  अभियंता सतीश वाघमारे, दिलीप धुमाळ, विजय सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह स्थापत्य, विद्युत, उद्यान, पाणीपुरवठा, जलनि:सारण, अग्निशमन, समाज विकास, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क आदी विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या पवनाथडी जत्रेमध्ये खाद्य पदार्थ, खेळणी, वस्तूंचे प्रदर्शन यांसह विविध उपक्रमाची माहिती देणारे बचत गटांचे  स्टॉल्स असणार आहेत. समाज विकास विभागामार्फत  या बचत गटांना विविध माध्यमातून संपर्क साधून अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जांच्या संख्येचा आणि प्रत्यक्ष सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानावरील जागेचा विचार करून स्टॉल्सधारकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या. पवनाथडी जत्रेमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना करताना त्या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे ते म्हणाले.  पिण्याचे पाणी, परिसरातील स्वच्छता, वैद्यकीय पथकासह आवश्यक औषधे, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, सीसीटीव्ही यंत्रणा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था आदींबाबत संबंधित विभागाने योग्य नियोजन करून त्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश प्रदीप जांभळे पाटील यांनी बैठकीत दिले.

शाकाहारी, मांसाहारी खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सच्या ठिकाणांसह परिसरात आपत्कालीन उपकरणांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करावे, असेही ते म्हणाले. महिला बचत गटांसह दिव्यांग, तृतीयपंथी बचत गटांचे देखील स्टॉल्स असणार आहेत.  सक्षमा, लाईट हाऊस, दिव्यांग  भवन फाऊंडेशन, उमेद जागर अशा उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्सदेखील पवनाथडी जत्रेत असणार आहेत. शिवाय खादी ग्रामोद्योग महामंडळाचे दालन देखील या जत्रेत असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पारंपरिक कला आणि मनोरंजनाचे विविध माध्यम या जत्रेत ठेवण्यात आले आहेत. या जत्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. त्यामुळे सर्व बाबी विचारात घेऊन पवनाथडी जत्रेचे उत्तम नियोजन करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

पवनाथडी जत्रेच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या विभागांनी केलेल्या कामाची आणि नियोजनाची माहिती या बैठकीत दिली.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow