'शिवशंभू शौर्यगाथा'ने उलगडली पराक्रमाची गाथा..
रंगमंचावर शिवकालीन युद्धतंत्र आणि शौर्यगाथेचा थरार;शिवजयंतीनिमित्त काल झालेल्या महानाट्यास ७ हजाराहून अधिक प्रेक्षकांची हजेरी

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आशिया खंडातील नामांकित ३०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'शिवशंभू शौर्यगाथा' या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले. या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपुर्ण जीवनापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानापर्यंत जीवनकार्याचे दर्शन घडविण्यात आले. विशेषतः दोन मजली रंगमंचावर, वेगाने पळणारे उंट, घोडे, सिंहासन, तोफा, सैनिकांची लढाई, पाळणा, आणि विविध पारंपरिक साधनसामग्रीसह या ऐतिहासिक महानाट्याची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.
दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त महानाट्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी अ प्रभाग जवळील नियोजित महापौर निवास मैदान येथे प्रथमच या भव्यदिव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास प्रभावीपणे सादर करण्यात आला, तीन दिवसात २० हजाराहून अधिक प्रेक्षकांनी महानाट्यास हजेरी लावली.
राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज
ऐतिहासिक प्रसंग, युद्धनीती, शौर्यगाथा तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा जीवनपट महानाट्याच्या माध्यमातून उलगडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास मोठी गर्दी झालेली होती. काल सुमारे ७ हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून महानाट्याचा थरार अनुभवला. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य रंगमंचाची उभारणी, कार्यक्रमाच्या अनुषंगाने वेशभूषा, संवाद, पारंपरिक युद्धसाहित्य आणि जिवंत देखावे यामुळे या महानाट्याला विशेष रंगत आली.
या भव्य आयोजनामुळे नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, शिवाय ऐतिहासिक गाथेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रभावी कार्याचे, विचारांचे, पराक्रमाचे आणि ज्वलंत इतिहासाचे प्रभावी दर्शन घडविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापनेचे महान ध्येय साध्य करणारे योद्धा होते. त्यांनी आदर्श राज्यकारभार व सैन्य संघटनेचे उत्तम व्यवस्थापन केले. कुशल बुद्धिमत्ता व मुत्सद्दी राजनितीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांनी कठोर कायदे आणि शत्रुंना नामोहरम करण्यासाठी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा प्रभावीपणे वापर केला.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक, पराक्रमी, धाडसी व निर्भिड योद्धा होते. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आणि शत्रुंविरूद्ध अत्यंत पराक्रमाने लढा दिला. संस्कृत आणि मराठी भाषांवर प्रभुत्व असलेले ते आदर्श राजा होते. या महानाट्याच्या यशस्वी आयोजनाने नागरिकांना त्यांच्या या प्रेरणादायी जीवनकार्याचा उलगडा झाला.
शिवशंभो शौर्यगाथा या महानाट्याची निर्मिती लेखक दिग्दर्शक प्रविण देशमुख यांनी केली. या महानाट्यास माजी उपमहापौर शैलजा मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले, राहुल कलाटे, अमित गावडे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, नितीन देखमुख, महेश बरीदे, उप अभियंता मीनल डोडल, वैभव पवार, अमर जाधव, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, नकुल भोईर, सागर तापकीर, धनाजी येळकर, निलेश शिंदे, दादासाहेब पाटील, सतिश काळे, प्रकाश कदम, प्रतिक इंगळे, हेमंत शिर्के, रवि सोळंके, सचिन अल्हाट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






