महापालिकेच्या सक्षमा महिला बचत गटांचा राष्ट्रीय पातळीवर सहभाग
केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेच्या उद्दिष्टात लावणार हातभार

पिंपरी, दि. २१ फेब्रुवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सक्षमा प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या बॅग, फोल्डर, डायऱ्या आणि बुकमार्क्स या वस्तूंचे येत्या २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय परिषदेमध्ये वितरण केले जाणार आहे. यामुळे महिलांच्या उद्योजकतेला नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षमा प्रकल्प राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ५,००० महिला बचत गटांना कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या २,५५६ बचत गट या प्रशिक्षणाचा लाभ घेत असून महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प महत्वांकाक्षी ठरत आहे.
केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील ३ कोटी महिलांना दरवर्षी १ लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच उपक्रमाच्या धरतीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सक्षमा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याद्वारे महिलांना केवळ बचत गटापुरते मर्यादित न ठेवता त्यांना मायक्रो-बिझनेस म्हणजेच लघु उद्योग सुरू करण्यास सहकार्य करण्यात येत आहे.
सक्षमा हा उपक्रम महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी एक मोठे पाऊल आहे. डिजीटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्य विकास, बाजारपेठांची ओळख आणि महिला बचत गटांना सक्षम उद्योजक बनविण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांची उद्योगांच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी सक्षमा उपक्रम राबविण्यात येत आहे. पश्चिम विभागीय परिषदेच्या व्यासपीठावर सक्षमा उपक्रमातील महिला बचत गटांचा सहभाग ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला मिळाले 'सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता' श्रेणीतील 'इनोव्हेशन ॲवॉर्ड' !!!
सक्षमा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात महिला बचत गटांसाठी नव्या बाजारपेठा तयार करणे, ई-कॉमर्सशी त्यांची ओळख करून देणे आणि थेट B2B (बिझनेस टू बिझनेस) संकल्पनेद्वारे संधी निर्माण करणे यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
- तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त, समाजविकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवडमधील महिला बचत गटांचा पश्चिम विभागीय परिषदेतील सहभाग -
• महिला उद्योजकतेचा गौरव – महिला बचत गटांनी तयार केलेल्या बॅग, फोल्डर, डायऱ्या आणि बुकमार्क्सचे परिषदेत होणार वितरण.
• ५,००० बचत गटांचा विकास – पाच वर्षे चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे महिलांना कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार.
• २,५५६ महिला बचत गटांचा सहभाग – महिला बचत गटांना बाजारपेठेची ओळख व्हावी यासाठी उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यावर भर.
• केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेस हातभार – सक्षमा उपक्रमामुळे केंद्र सरकारच्या ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याच्या लखपती दीदी या योजनेच्या उद्दिष्टात हातभार लागणार.
• डिजिटल व्यवस्थापन व बाजारपेठेचा विस्तार – तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला बचत गटांचा विकास आणि मोठ्या बाजारपेठांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचविण्यावर भर.
What's Your Reaction?






