कल्पकतेला नाविन्यतेची जोड! टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती उभारत सार्वजनिक जागा केली ‘कचरामुक्त’
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा अनोखा प्रयोग

पिंपरी, ११ फेब्रुवारी २०२५ : मोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखा उपाय केला आहे. या कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर येथील सार्वजनिक जागेवर खराब झालेले झाडू, बांबूच्या काठ्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे. 'आर्ट टू वेस्ट' ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला आहे. शिवाय याठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागले आहेत.
कल्पकतेला नाविन्यतेची जोड देऊन एखादी सार्वजनिक जागा कचरामुक्त करून अधिक सुंदर बनवण्याची कमाल महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी करून दाखवली आहे. चिंचवड परिसरातील कावळे वखार मोहननगर येथे असणाऱ्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून कचरा टाकला जात होता. येथे कचरा टाकू नये, असे वारंवार आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत होते. परंतु त्यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याने हा परिसर अस्वच्छ झाला होता. अखेर येथील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखा उपाय केला आहे.
एआय शिखर परिषदेत मोदींचे विधान: "नवीन तंत्रज्ञान रोजगाराच्या संधी निर्माण करतील"
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून खराब झाडू, बांबूच्या काठ्या, इतर टाकाऊ वस्तू यांचा कल्पकतेने वापर करून सुंदर व सुबक कलाकृती तयार केली. त्यामुळे येथील कचऱ्याची समस्या दूर तर झाली आहेच, शिवाय येथील स्थानिक नागरिक ही जागा स्वच्छ राहील, यासाठी काळजी घेऊ लागले आहेत. ही जागा कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होऊ लागले आहे. ही जागा कचरामुक्त करून तेथे टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती तयार करून उभारण्यासाठी महापालिका ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे व प्रभाग क्रमांक १४ चे आरोग्य निरीक्षक विकास शिंदे महापालिका अधिकारी, कर्मचारी आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कचरा मुक्त पिंपरी चिंचवड शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. चिंचवड परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी राबविलेली 'आर्ट टू वेस्ट' ही संकल्पना कौतुकास्पद आहे. अशा अभिनव संकल्पना राबविण्याचा प्रयोग आरोग्य विभागाकडून सातत्याने केला जात असतो. नागरिकांनीही पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.
- सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
What's Your Reaction?






