पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे १३वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन संपन्न
सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४-१५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड, पुणे येथे संपन्न झाले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक श्री. प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत तसेच पिं. चिं. सायन्स पार्कच्या संचालक मंडळाच्या शुभेच्छांसह संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मान. आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास अतिथी विशेष श्री. हेमंत वाटवे, चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर, विलो मॅथर अँड प्लॅट, पुणे तसेच ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष श्री. दा. कृ. सोमण, सायन्स पार्कचे संचालक श्री प्रशांत पाटील व श्री सारंग ओक, ज्येष्ठ खगोल अभ्यासक श्री. हेमंत मोने, सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नंदकुमार कासार, वैज्ञानिक अधिकारी श्रीम. सोनल थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भरत अडुर, डॉ. योगेश वाडदेकर, सारंग ओक, श्रीनिवास औंधकर, सचिन मालेगावकर, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. लीना बोकील, मयुरेश प्रभुणे, सुधीर फाकटकर, सुरेश चोपणे, मंगेश सुतार, सोनल थोरवे, नेहा नेवेस्कर यांनी आपल्या व्याख्यानांतून खगोलशास्त्रातील विविध विषयांबद्दल मार्गदर्शन केले. यासोबत पिं. चिं. सायन्स पार्क व आयसर पुणे यांचा संयुक्त प्रकल्प कल्पकघर द्वारे कृतीतून विज्ञानाचे प्रात्यक्षिक अंकिश तिरपुडे व सहकाऱ्यांनी दिले. सहभागींसाठी खास सायन्स पार्क मधील तारांगण तसेच इतर सुविधांची भेटदेखील आयोजित करण्यात आली होती.
ज्येष्ठ खगोल प्रसारक डॉ. निवास पाटील यांना त्यांच्या या क्षेत्रातील अविरत कार्यासाठी जीवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या संमेलनात 'ब्रम्हा' नावाच्या ग्रहाचे १९११ साली गणिताच्या आधारे भाकित करणारा लेख फ्रान्सच्या प्रसिद्ध जर्नलमध्ये लिहिणारे ज्येष्ठ खगोल अभ्यासक श्री व्यंकटेश बापूजी केतकर यांची ग्रंथसंपदा त्यांचे पणतू श्री रघुनाथ केतकर यांच्या साहाय्याने प्रदर्शित करण्यात आली. याच ग्रहाच्या जवळपासच्या कक्षेत नंतर १९३० साली प्लूटो चा शोध लागला होता.
सदर संमेलनास राज्यातील पिंपरी चिंचवड व पुणे सह सातारा, चंद्रपूर, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, बीड, मुंबई शहर व उपनगर आदी भागांतून सहभागींनी उपस्थिती लावली. यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यांत कार्यरत हौशी खगोल निरीक्षकांच्या संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले. पिं. चिं. सायन्स पार्कचे सुनील पोटे, पिं. चिं. तारांगणचे मल्लाप्पा कस्तुरे, उत्तम जगताप व सर्व शैक्षणिक तसेच कार्यशाळा सहकाऱ्यांच्या अथक मदतीने हे दोन दिवसीय संमेलन यशस्वीरित्या पार पडले.
What's Your Reaction?