‘पर्पल जल्लोष’चे निमंत्रण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील पोहोचले थेट दिव्यांगांच्या विद्यालयात
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करतानाच त्यांच्याशी साइन लॅग्वेजमध्ये साधला संवाद
पिंपरी : दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सोमवारी (१३ जानेवारी २०२५ ) थेट निगडी येथील सुहद मंडळ पुणे संचलित चिंचवड बधिर मूक विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने हे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला नक्की येणार असल्याचे सांगितले.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ जानेवारी २०२५ रोजी हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. यामध्ये ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, कार्पोरेट कंपन्या, संस्थांच्या सहभागाद्वारे दिव्यांगांसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा यासह विविध क्षेत्रातील नवनवीन संधींचे दारे उघडली जाणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटना, विविध शाळा यांनाही देण्यात येत आहे.
सोमवारी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी थेट निगडी परिसरात असणाऱ्या चिंचवड बधिर मूक विद्यालयात जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. थेट अतिरिक्त आयुक्त शाळेत आल्यामुळे मुलांचे चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मुलांनी जांभळे पाटील यांचे स्वागत केले, तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका उमा तारू, वरिष्ठ विशेष शिक्षिका पल्लवी पिंपळे, विशेष शिक्षक बालाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश टिळेकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे समन्वयक दत्तात्रय खुंटवड, विशेष शिक्षिका सोनम सांळुके आदी उपस्थित होते.
............
चौकट
शाळेतील विविध उपक्रमांचे केले कौतुक
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शाळेतील संगणक कक्ष, इयत्ता दहावीचा वर्ग, ग्रंथालय, चित्रकला वर्ग, शाळेचे ग्राउंड, प्रयोगशाळा, स्पिच रूम येथे भेट दिली. तसेच मुलांनी काढलेल्या चित्रकलेचे कौतुक केले. याशिवाय दिव्यांग मुलांसाठी शाळेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
.........
चौकट
साईन लॅग्वेजमध्ये विद्यार्थ्यांशी साधला संवाद
शाळेतील विद्यार्थ्यांना पर्पल जल्लोषचे निमंत्रण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शाळेतील शिक्षिकांच्या मदतीने, ‘पर्पल जल्लोष कार्यक्रमाला या…’ हे वाक्य साईन लॅग्वेजमध्ये कसे बोलायचे, हे जाणून घेतले. त्यानंतर जांभळे पाटील यांनी साईन लॅग्वेजमध्येच विद्यार्थ्यांना पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. विद्यार्थ्यानी देखील पर्पल जल्लोष कार्यक्रमाला नक्की येणार, असे सांगितले.
................
कोट
चिंचवड येथील विद्यालयाला भेट देऊन पर्पल जल्लोषचे निमंत्रण दिले. या शाळेला भेट देण्याचा अनुभव हा अविस्मरणीय असाच आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्याचा जो उत्साह आहे, तो खऱ्या अर्थाने सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. येथील शिक्षक या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी ज्या पद्धतीने काम करीत आहेत, ते देखील कौतुकास्पद आहे.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
What's Your Reaction?