आरक्षणातील फेरबदलास मान्यता देणेबाबत...

नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणेबाबत...

Feb 23, 2025 - 12:28
Feb 23, 2025 - 12:28
 0  8
आरक्षणातील फेरबदलास मान्यता देणेबाबत...

पिंपरी, दि. २२ फेब्रुवारी २०२५:- पिंपरी चिंचवड शहराच्या विकास योजनेत समाविष्ट असलेल्या स.नं. १५५ अ पै. (सि.स.नं. ५६६५ पै.) मधील आ.क्र. ९८ क्षेत्र (एक हेक्टर) या जागेवर प्रस्तावित असलेल्या पी.सी.एम.टी. बस टर्मिनल या आरक्षणामध्ये फेरबदल करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे ३७ कलम अन्वये महापालिका सभा ठराव क्र.८५३ दि.२१ फेब्रुवारी २०२५ अन्वये मान्यता दिली आहे.

या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व उद्यान विकसित करण्यात आले असून, त्या परिसरातील पडीक जागा ही पीएमपीएमएलच्या कोणत्याही उपक्रमासाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे, या क्षेत्राचा "भिमसृष्टी" या आरक्षणात समावेश करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आलेली होती.

या मागणीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांच्याकडे आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी ना-हरकत प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर केले आहे.

त्यानुसार महापालिका सभेच्या प्रशासकीय ठरावाद्वारे या फेरबदलास मान्यता देण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेसाठी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार, शासन राजपत्रात तसेच मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

संबंधित फेरबदलाबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास त्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. विहित मुदतीत हरकत,सूचना प्राप्त झाल्यास, नागरिकांना प्रत्यक्ष सुनावणी दिली जाईल व त्यानंतर अहवाल पुन:श्च महापालिका सभेस सादर करण्यात येईल. महापालिका सभेच्या अंतिम मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनास पाठविला जाईल. शासन निर्णय घेतल्यानंतर, कलम ३७ (२) अन्वये अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे. 

तथापि या फेरबदलासंबंधी कोणांस हरकत अथवा सूचना असल्यास एक महिन्याच्या आत त्यांनी महापालिकेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow