पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२५ :- बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची पायाभरणी करताना शिक्षण आणि समाजसुधारणेवर भर देत समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. असे मत मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत,सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले,सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक लेखाधिकारी चारुशीला जोशी, मुख्य लिपिक विजया कांबळे विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
"दर्पण" हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून जांभेकर यांनी समाजात नवीन विचारांची लाट आणली. त्यांनी पत्रकारितेसोबतच समाजसुधारणा, शिक्षण, आणि सामाजिक जागृतीच्या कार्यालाही चालना दिली. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेला पत्रकारितेच्या माध्यमातून नवे दालन खुले करून दिले. आजच्या डिजिटल युगातही त्यांची विचारधारा आणि समाजजागृतीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे निळकंठ पोमण म्हणाले.