पिंपरी - श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त 'संघर्षयोद्धा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि.१६) आयोजित केला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज आणि शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे यांनी दिली.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहे. आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, सुनील शेळके, महेश बालदी, राहुल कुल, अमित गोरखे, उमा खापरे, माजी आमदार बाळा भेगडे, अश्विनी जगताप यावेळी उपस्थित राहणार आहेत.
'संघर्षयोद्धा' या पुस्तकात खासदार बारणे यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. संघर्ष करून त्यांनी राजकारणात यश मिळविले आहे. त्यांनी केलेली विकास कामे या सर्वांचा उहापोह या पुस्तकात असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे यांनी सांगितले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.